अनंत विचार न्यूज दिनांक 5/12/2025
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली असून मतमोजणीपर्यंत मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पंढरपूर प्रशासनाने शासकीय धान्य गोडावून येथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे.
ईव्हीएम ठेवलेल्या संपूर्ण धान्य गोडावून परिसराभोवती दिवस-रात्र सुरक्षा तैनात असून परिसर सीसीटीव्ही कॅमेरांच्या पूर्ण निगराणीत आहे. या ठिकाणी १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
आतील बाजूस एसआरपीएफचा सशस्त्र बंदोबस्त दोन शिफ्टमध्ये असणार आहे. तर बाहेरील भागात शहर पोलिस ठाण्याकडून २ पोलिस उपनिरीक्षक व ६ अंमलदार अशा एकूण ८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह एकूण १८ पोलिस अधिकारी व कर्मचारी कडक सुरक्षेत कार्यरत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
तसेच सुरक्षा यंत्रणेबरोबरच पंढरपूर नगरपालिकेचे कर्मचारीही स्वतंत्ररित्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी ३ शिफ्टमध्ये ३८ कर्मचारी काम पाहत असल्याची माहिती महेश रोकडे, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका यांनी दिली.
मतमोजणीची तारीख जाहीर होईपर्यंत ईव्हीएम मशीन कडक पोलिस व यंत्रणेच्या निगराणीखाली राहणार असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
