
साप्ताहिक अनंत विचार न्यूज 7/3/2026
महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या व समाजकार्यासाठी झटणाऱ्या डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची नवनियुक्त खासदार म्हणून निवड झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ याच्या बळावर त्यांनी आज संसदेच्या पायऱ्या गाठल्या आहेत.
आपल्या निवडीबाबत भावना व्यक्त करताना डॉ. वाघमारे म्हणाल्या की, “नशिबाच्या रेषेपेक्षा कष्टावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पाठीशी शिंदे साहेबांसारखा खंबीर आशीर्वाद असतो. एका सामान्य कुटुंबातील मागासवर्गीय सुशिक्षित मुलीला संसदेत काम करण्याची संधी मिळणे ही मोठी अभिमानाची बाब आहे.”
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे त्यांनी सांगितले. या विश्वासाला पात्र ठरत सामान्य जनतेचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हा सन्मान केवळ माझा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी व सुशिक्षित मुलीचा आहे, असे सांगत समाजहितासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
