अनंत विचार न्यूज दिनांक 7/6/2026
प्रतिनिधी :
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 48 तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुन्हा क्रमांक 426/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अन्वये दिनांक 2 जून 2026 रोजी दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी यांच्या वडिलांचा, भारत पांडुरंग माने यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात व शरीराच्या इतर भागावर गंभीर वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), एसडीआर तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. मोहोळ, पेनूर टोल नाका, टेंभुर्णी, तिसगाव तसेच नारायण चिंचोली, तुंगत व रोपळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली.
सखोल तपासातून असे निष्पन्न झाले की आरोपी रमेश धोंडीराम मोठे (वय 45, रा. नरखेड) याने मयत भारत माने यांच्या हालचालींची पूर्वमाहिती गोळा करून खुनाचा कट रचला होता. त्याने ललिता दत्तात्रय सोळगे उर्फ कोळगे (वय 43, रा. गणेशवाडी, ता. मंगळवेढा) हिच्यासोबत संगनमत करून 31 मे 2026 रोजी भारत माने यांना रोपळे येथील शेतात नेले. तेथे दोघांनी मिळून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून खून केल्याचा आरोप आहे.
प्रारंभी आरोपींनी दिशाभूल करणारी उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी आरोपी रमेश धोंडीराम मोठे व ललिता दत्तात्रय सोळगे यांना दिनांक 5 जून 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपासात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस हवालदार साजन भोसले, दीपक भोसले, सुहास देशमुख, मंगेश रोकडे, स्वप्नील वडदेकर, जनार्दन करे, रतन जाधव तसेच पोलीस कर्मचारी गोंगाणे, इरफान शेख, विजयकुमार आवटी, हसन नदाफ, महेश गोडसे, रामभाऊ चाटे, सुवर्णा कदम, ननावरे मॅडम व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अत्यंत गुंतागुंतीच्या या खुनाच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करून आरोपींना अटक केल्याबद्दल पंढरपूर तालुका पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
