अनंत विचार न्यूज दिनांक 21/11/2025
नांदेड : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या कु. यज्ञा जगदीश दुसाने या निरागस बालिकेवरील अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येप्रकरणी प्रदेशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या भीषण घटनेचा तीव्र निषेध करीत नांदेड जिल्ह्यातील समस्त सोनार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
समाजाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल टाक (धानोरकर), उत्तर नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष मधुकर टाक, तसेच दक्षिण नांदेड जिल्हा अध्यक्ष गिरीधर काशीनाथ मैड यांनी जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे कठोर कारवाईची मागणी नोंदवली.
निवेदनात सांगितले आहे की, एका नराधमाने केलेल्या पाशवी कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.
समाजाने शासनाकडे पुढील मागण्या सादर केल्या आहेत—
या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.
आरोपीला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळू नये.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
पीडित कुटुंबाला योग्य संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी.
“या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन उभारावे लागेल,” असा इशारा समाज नेत्यांनी निवेदनातून दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
