अनंत विचार न्यूज दिनांक 30/11/2025
डोंगराळे (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे घडलेल्या पिडीत कु.यज्ञा दुसाने बालिकेवरील अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वाचा आणि निर्णय घेतला आहे. या प्रकरणासाठी देशातील ख्यातनाम विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून, पुढील न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार चित्राताई वाघ यांनी पीडित परिवारास दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. घटनेनंतर समस्त सोनार समाजातील संताप तसेच न्यायासाठी केलेल्या मागणीची गंभीर दखल घेऊन हा निर्णय तत्परतेने घेण्यात आल्याचे शासनस्तरावरून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार चित्राताई वाघ यांनी स्वतःहून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून घटनेची माहिती, समाजातील रोष आणि पीडितांसाठी न्यायाची मागणी याबाबत सविस्तर विवेचन केले होते. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने तातडीने ॲड. निकम यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली.
घटनेनंतर राज्यातील समस्त सोनार समाजाने ठिकठिकाणी काढलेल्या मूक निषेध मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळाला. समाजाच्या या शांत पण ठाम आंदोलनाची नोंद शासनाने गंभीरपणे घेतली असून या निषेधामुळेच प्रकरणाच्या गतीला बळ मिळाल्याचेही मानले जात आहे.
डोंगराळे येथील अत्याचार पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि गुन्हेगारी प्रकरणांतील यशस्वी कारकीर्दीमुळे या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात शक्य होईल, अशी सर्वत्र अपेक्षा आहे.
स्थानिक नागरिक, समाजबांधव तसेच राज्यातील विविध समाजघटकांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, दिवंगत चिमुकलीला न्याय मिळविण्यासाठी आता न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
