अनंत विचार न्यूज दिनांक 23/2/26
पंढरपूर भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर पंढरपूर तालुका पोलिसांनी पहाटे कारवाई करून एकूण 6 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 एकर जॅकवेल परिसरातील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (क्रमांक MH 11 DD 5899) विसावा तीन रस्ता चौक येथे ताब्यात घेण्यात आला. सदर टेम्पो चालक आदित्य मनोज माने (रा. आंबेगाव, ता. पंढरपूर) हा महाराष्ट्र शासनाची मालकी असलेली भीमा नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी आदित्य मनोज माने तसेच टेम्पो मालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 305 व 303 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून वाळू व अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण 6.15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे, अभिमन्यू गरड, सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी तसेच पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हासन नदाफ यांच्या पथकाचा सहभाग होता.
पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे.
