अनंत विचार न्यूज दिनांक 30/12/2025
पंढरपूर – श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीच्या प्रशासकीय इतिहासात एक महत्त्वाचा व उल्लेखनीय टप्पा नोंदवला गेला असून, समितीच्या सभेत व्यवस्थापक पदाचा कार्यभार यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल पृथ्वीराज उर्फ राजाभाऊ राऊत यांच्या अभिनंदनाचा अधिकृत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
श्री राऊत यांनी मागील चार महिन्यांच्या कालावधीत व्यवस्थापक पदाचा कार्यभर जबाबदारीने, कार्यक्षमतेने व प्रशासकीय शिस्त राखत पार पाडला. त्यांच्या कार्यकाळात मंदिर प्रशासनाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त न होणे, हे त्यांच्या पारदर्शक, नियोजनबद्ध व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे स्पष्ट द्योतक मानले जात आहे.
त्यांच्या कार्यकाळात मंदिर समिती, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, समाज माध्यमांच्या माध्यमातून मंदिर प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रशासन, कर्मचारी व भाविक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व परिणामकारक करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
तसेच, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण व दूरगामी निर्णय पुढे आणले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी (उपदान) देणे तसेच सेवानिवृत्तीनंतर श्री विठ्ठलाची नित्य पूजा मिळावी, या भावनिक व श्रद्धेशी संबंधित ठरावास आज मंदिर समितीने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री राऊत यांनी दाखविलेली प्रशासनावरची पकड, निर्णयक्षमता, समन्वयाची भूमिका व कर्मचारीहिताची जाण यामुळे श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यक्षमतेत निश्चितच सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मंदिर समितीने अभिनंदनाचा ठराव पारित करून त्यांच्या कार्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सक्षम, संवेदनशील व दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यामुळे मंदिर समितीचे प्रशासन अधिक सक्षम, विश्वासार्ह व लोकाभिमुख होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
