अनंत विचार न्यूज दिनांक 31/1/2026
ठाणे : साप्ताहिक संपादक असोसिएशनच्या वतीने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मूलभूत पत्रकारिता, आरएनआय व पीआयबीचे नियम, डिजिटल माध्यमांचे आव्हाने तसेच पर्यावरण विषयक पत्रकारितेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचा शुभारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, डिजिटल माध्यम सल्लागार युवराज आर्य, अॅड. स्मिता चिपळूणकर (जर्नलिस्ट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष) तसेच पर्यावरण रक्षक विजयकुमार कट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांनी पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहावर भाष्य करताना सांगितले की, मोबाईल व सोशल मीडियामुळे पत्रकारिता भरकटण्याचा धोका वाढला आहे. मोबाईलवर दिसणारी प्रत्येक गोष्ट बातमी नसते. दर्जेदार पत्रकारितेसाठी वाचन व सातत्यपूर्ण लेखन अत्यावश्यक असून प्रत्येक संपादकाने किमान एक तरी पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. साप्ताहिक चालविताना येणाऱ्या अडचणींवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
डिजिटल माध्यमांबाबत मार्गदर्शन करताना युवराज आर्य यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहिती संकलन व लेखन सुलभ झाले असल्याचे सांगितले. मात्र, डिजिटल माध्यमांवरून मिळणाऱ्या माहितीची सत्यता तपासणे आवश्यक असून घटनाक्रमाच्या आधारे बातमी मांडल्यास लेखन अधिक प्रभावी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरएनआय व पीआयबीच्या नव्या नियमांविषयी अॅड. स्मिता चिपळूणकर यांनी सविस्तर माहिती दिली. वृत्तपत्र अपलोड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आयडी व पासवर्डची सुरक्षितता, पीआयबीकडे वेळेत अंक सादर करणे तसेच वार्षिक विवरणात अचूक आकडेवारी भरणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन किंवा आयडीचा गैरवापर झाल्यास वृत्तपत्र बंद होण्याचा धोका असल्याने संपादकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण रक्षक विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण विषयक पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करत या विषयावर प्रभावी लेखन, समस्या मांडणी व जनजागृती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यासाठी आवश्यक माहिती व साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी संपादकांच्या विविध अडचणी, शासनदरबारी मांडलेल्या मागण्या व संघटनेच्या एकजुटीचे महत्त्व स्पष्ट केले. कार्याध्यक्ष भीमराव धूळप यांनी संघटनेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे सांगत संपादकांनी एकत्रित राहिल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या उपाध्यक्षा सारिका शिंदे यांनी उपस्थित मान्यवर व सहभागी संपादकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
