अनंत विचार न्यूज दिनांक 18/1/2026
पंढरपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश देत डॉ. सौ. प्रणिताताई भालके यांनी पोलीस संकुलातील सी.सी.टी.व्ही. कंट्रोल रूमला अचानक भेट देऊन शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान शहरात बसवण्यात आलेल्या १५७ सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांपैकी केवळ ६५ ते ७० कॅमेरेच सध्या कार्यरत असल्याची गंभीर बाब उघड झाली. ही स्थिती अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले.
तात्काळ आदेश : एकही कॅमेरा बंद राहणार नाही
नगराध्यक्षा डॉ. भालके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील सर्व सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करण्याचे कडक आदेश दिले. वाहतूक नियंत्रण, गुन्हेगारी घटनांवर नजर, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता तसेच आपत्कालीन प्रसंगी जलद कारवाईसाठी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
सुरक्षित, शिस्तबद्ध आणि स्मार्ट पंढरपूरचा निर्धार
कंट्रोल रूममधील तांत्रिक व्यवस्था, थेट मॉनिटरिंग प्रणाली आणि कर्मचाऱ्यांचे कामकाज याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर नगराध्यक्षा म्हणाल्या की,
“पंढरपूर शहर सुरक्षित, शिस्तबद्ध आणि स्मार्ट बनवण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.”
या ठाम भूमिकेमुळे शहरातील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होणार असून, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या पाहणीद्वारे देण्यात आला आहे.
