अनंत विचार न्यूज दिनांक 20/11/2025
दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महायुतीमधील सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या, अंतर्गत मतभेद आणि पक्ष प्रवेशांवरील वाद यांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रार शहा यांच्या समोर मांडली. महायुतीत वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असून, फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेले निर्णय संपूर्ण महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतात, असे शिंदे यांनी शहा यांना सांगितल्याचे समजते.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश, घडामोडी आणि वादविवादांचा लोंढा उसळला आहे. काही नेत्यांकडून महायुतीविरोधी गटांना ‘रसद’ पुरवली जात असल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला. शिवाय, पक्ष प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहितीही त्यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिली.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समन्वयाचा काळ अधिक सुरळीत होता, असा संकेत देत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या पक्षाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची माहितीही समोर येत आहे.
महायुतीमध्ये वाढत चाललेली अंतर्गत घुसळण आणि निवडणुकांच्या तोंडावरचे खटके या भेटीनंतर आणखी ठळकपणे समोर आले आहेत
