अनंत विचार न्यूज दिनांक 25/09/2025पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर : महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी म्हणून लौकिक असलेल्या पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणाशी वारकरी भक्तांची अखंड वारी चालूच असते. या वारीसोबतच इथे आता एक नवी वारी सुरु झाली आहे.

विठ्ठल मंदिरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर वसलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर हे मंदिर परिसरातील सर्वात मोठे वाहनतळ म्हणून प्रसिद्ध आहे. पण मागील तीन वर्षांत हा परिसर केवळ वाहनतळ न राहता हरित मंदिरात रूपांतरित होऊ लागला आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी सर्वगोड यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीने आज नवा इतिहास घडवला आहे.
या वर्षी परतीच्या पावसाने या उपक्रमाला जणू आशीर्वादच दिला. टपटपणाऱ्या थेंबांनी अंकुरलेल्या रोपट्यांना पाणी मिळालं, मातीचा गंध दरवळला आणि हिरवाईनं आंबेडकर नगराचं रूप पालटून टाकलं. वारकरी जेव्हा मंदिरातून दर्शन घेऊन आंबेडकर नगर वाहनतळावर येतात, तेव्हा त्यांना आता फक्त मोकळी जागा नव्हे तर पानांची सावली, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल आणि निसर्गाची शीतल मिठी अनुभवायला मिळते.
आत्तापर्यंत आंबेडकर नगर गेट, गौतम विद्यालय, मुर्शिदबाबा दर्गा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, गोपाळपूर रोड, मंगळ
वेढा रोड, सात नंबर शाळा, बडा कब्रिस्तान, विठ्ठल नगर, बुद्ध विहार अशा अनेक ठिकाणी सुमारे ५०० हून अधिक वृक्ष लावले गेले आहेत.
वेढा रोड, सात नंबर शाळा, बडा कब्रिस्तान, विठ्ठल नगर, बुद्ध विहार अशा अनेक ठिकाणी सुमारे ५०० हून अधिक वृक्ष लावले गेले आहेत.या हिरवाईच्या फौजेत कदंबाच्या सुवासिक छाया, मोहगनीची उंच दिमाखदार झाडं, बकुळाची सुगंधी फुलं, अर्जुनाची रुबाबदार उभारणी, वड-पिंपळाची विशाल सावली, उंबराचं शीतल अस्तित्व, लिंबाची औषधी पानं, जांभुळाचा गोडवा आणि बहाव्याची सोनसळी झुंबरे अशा निसर्गदूतांचा समावेश आहे.
या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. अनेक कुटुंबांनी रोपटी लावून त्यांचं संगोपन स्वतःच्या लेकरांप्रमाणे केलं आहे. शाळकरी मुलं या हिरवाईत खेळताना, वारकरी झाडांच्या सावलीत विसावताना आणि वृद्ध मंडळी पक्ष्यांच्या गाण्याचा आनंद घेताना दिसतात. त्यामुळे आंबेडकर नगर हे केवळ वसाहत नसून निसर्गाशी एकरूप झालेलं जीवनमान म्हणून घडू लागलं आहे.
वारकरी परंपरा जशी समतेचा आणि भक्तीचा संदेश देते, तशीच ही वृक्षलागवड चळवळ पर्यावरण संवर्धनाचा संदेश देते. हिरवीगार झाडं जणू म्हणतात “आम्ही सावली देऊ, प्राणवायू देऊ, गंध देऊ, सौंदर्य देऊ; फक्त आम्हाला जपून ठेवा.”

आज आंबेडकर नगर हिरवाईच्या गंधाने उजळून निघाले आहे. परतीच्या पावसाचा स्पर्श, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग यांच्या संगमातून हे नगर आता हरित वारीचे पंढरपूर म्हणून नावारूपास येत आहे
