अनंत विचार न्यूज दिनांक 9/11/2025
संपादकीय : “पक्ष नव्हे, काम बघा; नेते नव्हे, माणूस बघा”
— संपादक : नागेश आदापुरे
नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल रंगतोय, पण यावेळी चित्र थोडं वेगळं आहे. पक्ष, आघाड्या, युती, मोठमोठ्या बैठका — सगळं सुरू आहे, पण मतदारांच्या मनातलं समीकरण काही वेगळंच तयार होतंय. कारण लोक आता घोषणांनी नाही तर “गल्लीतला उपयोग” पाहतायत.
आता मतदार विचारतो — “हा माझ्या गल्लीतला माणूस आहे का? माझ्या प्रश्नाला उत्तर देतो का? अडचणीत फोन घेतो का?” एवढंच पुरेसं आहे निर्णय घेण्यासाठी. मग तो अपक्ष असो वा कोणत्याही पक्षाचा उमेदवार — जनतेला उपयोगी पडणारा असेल तरच तो खरा निवडून येणारा.
मोठ्या पक्षांच्या बॅनरवर चेहरे झळकतायत, बैठका घेतल्या जातायत, गुप्त चर्चासत्रं, राजकीय डावपेच — पण गल्लीपातळीवर लोकांचं गणित आता वेगळंच झालंय. कारण गल्लीत ठरतो “जवळचा माणूस”, तिथं पैसा, शक्ती किंवा वरचं राजकारण काही कामाचं नाही.
मतदारांना आता केवळ वचने नव्हे, तर अनुभव महत्त्वाचा आहे. प्रत्येक गल्ली ठरवणार आहे —
“हा आमचा माणूस आहे का नाही?”
यावेळी मतदारांचा सूर स्पष्ट आहे या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय ठरणार आहे, कारण लोकांना हवे आहेत काम करणारे युवक — ज्यांनी गल्लीत व परिसरात प्रत्यक्ष योगदान दिलंय.
“ना पक्ष, ना आघाडी — फक्त काम करणारे नेते!”
अशीच मतदारांची मनोवृत्ती आता स्पष्ट दिसते.
म्हणून या वेळी कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही नेत्याच्या बंद दरवाज्यातल्या चर्चांना फारसं महत्त्व उरलेलं नाही.
कारण २०२५ ची निवडणूक ही पदवीधर युवा पिढीने आपल्या हातात घेण्याचा निर्धार केलेली आहे.
