अनंत विचार न्यूज दिनांक 4/10/2025
पंढरपुरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये पंढरपूर एज्युकेशन सोसायटी ही अत्यंत मोठी, नावलौकिक असणारी, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व राष्ट्रहित जागवणारी शिक्षण संस्था म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो.या संस्थेची 1947 रोजी विजयादशमीदिवशी स्थापना झाली व पंढरपुरात एका शैक्षणिक गंगेचा उगम झाला. आज या संस्थेचा 78 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.संस्थेवर प्रेम करणारे अनेक हितचिंतक तसेच सर्व शाखांचे आजी-माजी विद्यार्थी,पालक,माजी शिक्षक यांनी मोठ्या आत्मीयतेने आवर्जून प्रशालेस भेट देऊन संस्थेवरील व प्रशालेवरील आपली श्रद्धा व्यक्त केली. परंपरेप्रमाणे याहीवर्षी पान-सुपारीस सोहळ्यास पंढरपुरातील अनेक मान्यवर उपस्थित राहून पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे आद्य संस्थापक तथा पंचरत्न यांना विनम्र अभिवादन केले तसेच संस्थेच्या सचिवपदी विराजमान असलेले श्री पटवर्धन सर यांना नुकताच रोटरी क्लब पुणे नॉर्थ यांच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचबरोबर कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय. पाटील सर यांनाही आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त करण्यात आला सूर्योदय फाउंडेशन उद्योग समूह यांच्यावतीने नुकताच कवठेकर प्रशालेस आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला. म्हणून आजचा वर्धापनदिन हा संस्थेच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. तसेच कवठेकर प्रशालेच्यादृष्टीने अत्यंत अभिमानाचा व सोनेरी क्षण म्हणून नोंदला गेला.यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी, आजी-माजी आमदार यांनीही प्रशालेस आवर्जून भेट देऊन विद्यार्थी काळात असताना शाळेतील अनुभव या ठिकाणी व्यक्त केले माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री अभिजीत पाटील व त्यांचे बंधू श्री अमर पाटील त्यांचे सर्व सहकारी, माजी आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे सर्व सहकारी यांनीही प्रशालेस आपुलकीने भेट दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव आदरणीय पटवर्धन सर यांच्या शुभहस्ते कर्तुत्ववान आमदार अभिजीत पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.एकंदरीत पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन हा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला व संस्मरणीय ठरला. मागील ५० वर्षाच्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे कवठेकर प्रशाला व आदर्श बाल व प्राथमिक मंदिर यांचे दसरा संचलन अत्यंत नेटके,नियोजनबध्द,दिमाखदार असे पार पडले.सर्व पंढरपूरकरांनी संचलन पाहून उस्फुर्तपणे शाळेबद्दल गौरवास्पद भावना व्यक्त केल्या. यावेळेस पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे प्रमुख त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व पंढरीतील प्रतिष्ठित नागरिक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कवठेकर प्रशालेमध्ये आवर्जून उपस्थित होते.
