अनंत विचार न्यूज दिनांक 14/1/2026
प्रतिनिधी/
राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समितीच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात आला. सौ. मंदाकिनी नरसिंह चिवटे व नरसिंह मनोहरपंत चिवटे यांना ‘राजपिता शाहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नरसिंह मनोहरपंत चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य, महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्स डीलर्स असोसिएशनचे संचालक तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. सत्य, प्रामाणिकपणा, राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपत त्यांनी आयुष्यभर समाजहितासाठी कार्य केले. त्यांच्या सामाजिक, पत्रकारितेतील व संघटनात्मक योगदानाचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडलेला आहे.
सौ. मंदाकिनी चिवटे यांनी कुटुंबसंस्कार, मूल्याधिष्ठित जीवनशैली व सामाजिक संवेदनशीलता जपत आदर्श मातृत्वाची भूमिका निभावली. त्यांच्या संस्कारांतूनच सामाजिक जाणिवा असलेले, राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व घडले आहे.
राजपिता शाहाजी राजांनी ज्या आदर्श संस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराज घडवले, त्याच प्रेरणादायी मूल्यांवर आधारित संस्कार चिवटे दाम्पत्यांनी आपल्या मुलांवर केले. त्या संस्कारांतून घडलेले आरोग्यदूत मंगेश चिवटे आज महाराष्ट्रभर आरोग्यसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करत असून समाजात त्यांचा आदराने उल्लेख केला जात आहे.
हा पुरस्कार केवळ एका कुटुंबाचा गौरव नसून संस्कार, त्याग, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम या मूल्यांचा सन्मान आहे. चिवटे दाम्पत्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची ही योग्य दखल असून हा सन्मान समाजातील प्रत्येक पालकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
