- अनंत विचार न्यूज दिनांक 16/11/2024
प्रतिनिधी/
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मतदार संघातील जनतेच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मतदारसंघांमध्ये आलेल्या हजारो कोटींच्या निधीवर टिकात्मक भाष्य करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी प्रचारसभा दौऱ्यादरम्यान केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकी च्या अनुषंगाने भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी भाजपा व महायुती पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवेढा तालुक्यातील नंदुर शिवणगी, जित्ती,भोसे, आंधळगाव,लक्ष्मी दहिवडी, गोणेवाडी या गावांमध्ये प्रचार दौरा करून ग्रामस्थ मतदारांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की,विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची अवघी ३ वर्षांची संधी मिळाली.परंतु अतिशय अल्पकाळामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करत आपण मतदारसंघातील सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षपणे गेल्या अनेक वर्षांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागून अनेक विकास कामे पूर्ण होऊन विकासाच्या व प्रगतीच्या माध्यमातून मतदार संघामध्ये परिवर्तनाचे मोठे चित्र दिसत असताना केवळ आपले राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांनी या विकास निधीवर केवळ टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. परंतु मतदारांच्या समोर मतदार संघातील विविध गावांमध्ये झालेली कामे विकास पुस्तिकेच्या माध्यमातून समोर असल्यामुळे त्यांच्या टीकेला कोणीही महत्त्व न देता मला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देतील असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.
येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने मला ५ वर्षांचा पूर्ण कालावधी मिळणार असल्यामुळे त्या कालखंडात मतदार संघामध्ये एकही विकासाचे काम शिल्लक ठेवणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पार पडलेल्या या प्रचार दौऱ्यामध्ये विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करून पुन्हा आमदार आवताडे यांच्या हातीच लोकप्रतिनिधीच्या रूपाने या मतदारसंघाच्या चाव्या देणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
या प्रचार दौऱ्या दरम्यान भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध गावांचे सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.