
अनंत विचार न्यूज दिनांक 17/07/2025
पंढरपूर :- आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द 01 (दिनांक 26 जून) ते आषाढ शुध्द 15 (दिनांक 10 जुलै) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 7505291 रुपये अर्पण, 28833569 रुपये देणगी, 9404340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4541458 रुपये भक्तनिवास, 14471348 रुपये हुंडीपेटी, 3245682 रूपये परिवार देवता तसेच 25961768 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 1245075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा /बस चे 32 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 7706694 रुपये अर्पण, 26922578 रुपये देणगी, 9853000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 5060437 रुपये भक्तनिवास, 9355073 रुपये हुंडीपेटी, 3179068 रूपये परिवार देवता तसेच 22153601 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 628109 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
सन 2024 च्या आषाढी यात्रेत रू. 84858560/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 108408531/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू. 23549971/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
श्री विठ्ठल अलंकार तपशील
सोने मुकुट, मोत्याचा तुरा, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगनजोड, दंडपेट्याजोड, नाम हिऱ्याचा, शिरपेच, मोत्याची कंटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तोडे जोड, तुळशीची माळ, मत्स्य जोड इत्यादी
श्री रुक्मिणी माता.
सोने मुकुट, वाक्या जोड, तोडेजोड, तांबडी चिंचपेटी, जवं मणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी
श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न,
पंढरपूर . आषाढी एकादशी रविवार, दिनांक 6 जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दि. 27 जून रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते.
आज बुधवार, दि. 16 जुलै रोजी मुहूर्तानुसार श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य श्री भास्करगिरी बाबा व ह.भ.प. प्रकाश जवंजाळ यांच्या हस्ते संपन्न झाली. सदर पुजेच्या सुरवातीला व्यवस्थापक मनोज श्रोत्री व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले.
तसेच श्रीस अलंकार परिधान करण्यात आले. याशिवाय, देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार आहे. आजपासून श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ व पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.