
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, news portal, marathi news, marathi, photo, 26 june 2024, नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील मरगळ झटकली जाईल :- प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख
अनंत विचार न्यूज दिनांक 26/6/2024
प्रतिनिधी पंढरपूर/
पंढरपूर–“शैक्षणिक क्षेत्राला आलेली मरगळ नवीन राष्ट्रीय धोरणामुळे झटकली जाईल. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच कौशल्य प्राप्त होईल. त्यामुळे शिक्षणातून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी असणारी कौशल्ये संपादन करता येतील. विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे. ज्ञान संपादनासाठी कला, वाणिज्य, विज्ञान अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढावी यासाठी त्यात तरतूद करण्यात आली आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना समृद्ध बनविण्यासाठी प्राध्यापकांनी सकारात्मक दृष्टीने बदल स्वीकारले पाहिजेत” असे प्रतिपादन प्राचार्य महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय आणि सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत आयोजित ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, प्रा. डॉ. पंचाप्पा वाघमारे, प्रा.डॉ. हनुमंत आवताडे, प्रा. डॉ. भगवान अधटराव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की, “इंग्रजांनी त्यांच्या सोईनुसार शिक्षण पद्धती भारतात आणली. तेंव्हापासून ती पद्धती बदलली गेली नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे प्रभुत्त्व निर्माण होण्यासाठी अशा स्वरूपाची शिक्षण पद्धती गरजेची होती. भारतीय हा ज्ञानाच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करू शकतो. अमेरिकेतील सर्वोच्च असणाऱ्या महाविद्यालयाचे पन्नास टक्के प्राचार्य हे भारतीय आहेत. त्यामुळे बदललेली शैक्षणिक पद्धती ही देशाला विकासाच्या टप्प्यावर घेवून जाण्यास मदत करेल.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो. सध्या भारताचा संशोधनावर होणारा खर्च हा एकूण आर्थिक बजेटच्या एक टक्क्याहून कमी आहे. इस्राईलसारखा देश एकूण उत्पन्नाच्या सात टक्के खर्च संशोधनावर करतो. जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात प्रभुत्त्व निर्माण करण्यासाठी आपणास अनेक धोरणात बदल करावे लागतील. शैक्षणिक क्षेत्रातील हा बदल देशाला निश्चितच चांगल्याप्रकारे मार्गक्रमण करणारा ठरेल.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी कोकाटे यांनी केले. या कार्यशाळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दोनशेहून अधिक प्राध्यापक आणि प्राचार्यांनी सहभाग नोंदविला. प्रा. डॉ. शिवाजी वाघमोडे आणि प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रा. डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी, अभिजित जाधव, अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले.