
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत :- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ANANT VICHAR NEWS, 9 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, group photo
अनंत विचार न्यूज दिनांक 9/2/2024
पंढरपूर, दिनांक 9:- सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा, पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळांवर मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 413 कोटी 13 लाखांची तरतूद केली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी घेतला. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख,माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर,अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी उर्वरित कामे पूर्ण व दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करावे. सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने कामे करण्यात येत असून,जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विकास कामांना निधीची कमतरता भासणार नाही. नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यात रस्ता सुधारणा करणे, नवीन रस्ता करणे रस्ता करणे अशा 820 कामांना 1834 कोटी मंजूर करण्यात आला आहे. सुधारित आराखड्यानुसार सद्यस्थितीत पंढरपूर शहरातील विकास कामांमध्ये पंढरपूरकडे येणारे रस्ते व पालखी मार्ग, पालखी तळ विकास, पालखीतळ भुसंपादन, नामदेव स्मारक आदी 108 कामे मंजूर असून, त्यापैकी 66 कामे पूर्ण झाली तर 16 कामे प्रगतीपथावर आहेत. यामधून 16 कामे शासनाने वगळली आहेत तर 9 कामे सुरू करावयाचे आहेत.
वारी व इतर कालावधीत वाहन पार्किंगसाठी यमाई तलावाजवळील वाहनतळ विकसित करण्यात येत असून ते काम प्रगतीपथावर आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शौचालयाची कामे सुलभ इंटरनॅशनल यांच्यामार्फत करण्यात येत असून, पंढरपूर शहरात एकूण 18 ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आली आहेत.
तर पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व वाळवंट परिसरात तीन पोलीस चौकी व तीन वॉच टॉवर पोलीस विभागाच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पालखी तळ व रिंगण विकासाची 21 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधिक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली.