
अनंत विचार न्यूज दिनांक 25/8/2024
जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात ३ कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असेही त्यांनी सांगितले.
जळगाव येथील विमानतळ परिसरातील प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते.
राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्वपूर्ण आहे. मागील एक महिन्यात 11 लाख दीदी लखपती बनल्या. यात 1 लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. लखपती दीदी हे संपूर्ण परिवाराला सशक्त बनविण्याचे अभियान आहे. महिला लखपती दीदी बनने हे संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिलांसाठी ३ कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात 70 टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत 10 कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत 9 लाख कोटीची मदत केली, असे त्यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिला बचतगटांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाविकांना आदरांजली
दरम्यान, आपल्या भाषणात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटूंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.