
काँग्रेस logo, Panja logo, निवडणूक
अनंत विचार न्यूज दिनांक 21/4/2024
पंढरपूर (प्रतिनिधी)
लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे विश्वासात घेत नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन, काँग्रेसला रामराम ठोकणारे हनुमंत मोरे हे आपला राजकीय निर्णय दोनच दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
मागील महिन्यात १५ मार्च रोजी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षाचा शिष्टाचारच वरिष्ठ नेतेमंडळींकडून पाळला जात नाही, या पक्षात आपला स्वाभिमान दुखावला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. तालुकाध्यक्ष पदाबरोबरच काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला होता. हा राजीनामा काँग्रेस पक्षाकडून अद्याप स्वीकारला गेला नाही. तरीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली भूमिका, येत्या दोनच दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती हनुमंत मोरे यांनी दिली. ते पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या समवेत ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल बोराडे, आप्पा थिटे, नितीन व्यवहारे , दिलीप कोरके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हनुमंत मोरे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये त्यांनी आजतागायत जिल्हा सहसचिव, जिल्हा सचिव, माढा तालुका निरीक्षक अशी अनेक पदे भूषवली होती. यावेळी त्यांनी आपल्या कामातून काँग्रेसमध्ये मोठे नाव केले होते. या कामाच्या जोरावरच त्यांची ३० डिसेंबर २०२२ रोजी, पंढरपूरच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली होती. तालुकाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पक्षासाठी अनेक कार्यक्रम घेऊन धडाका उडवून दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांची वरिष्ठ नेते मंडळींकडून निराशा झाली. काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणजे मिनी आमदारच असतो. परंतु या पदाचा सन्मान वरिष्ठ नेते मंडळींनी राखला नाही. परिणामी हनुमंत मोरे हे नाराज झाले. त्यांनी १५ मार्च २०२४ रोजी आपला राजीनामा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे सादर केला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता.
समाजकार्यातून राजकारणाकडे आलेल्या हनुमंत मोरे यांना, महिन्याभरात अनेक नेते मंडळींकडून पाचारण करण्यात आले. परंतु त्यांनी कोणालाही शब्द दिला नाही. अखेर राजकारणाच्या प्रवाहात राहण्यासाठी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून, पुढील दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहोत, अशी प्रतिक्रिया हनुमंत मोरे यांनी दिली.