
अनंत विचार न्यूज दिनांक 12/1/2025
पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी आलेल्या विकी दिनेश दहिवाळ या भाविकाचा मोबाईल हरवला होता. संबंधित भाविकांकडून मोबाईलची शोधा शोध होत असताना, पश्चिमद्वार येथील सफाई कर्मचारी छाया कुमार रणदिवे यांना सदरचा मोबाईल मिळून आला असता, त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात जमा केला व शहानिशा झाल्यानंतर संबंधित भाविकास परत करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
संबंधित भाविक हे बीड येथील रहिवाशी असून, आज श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल मंदिर परिसरात हरवला होता. परंतू, अवघ्या काही तासातच मोबाईल परत मिळाला. संबंधित कर्मचा-यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वांनी कौतुक करून अभिनंदन केले. आजच्या काळातही अनेकजण आपली सेवा प्रामाणिक आणि तत्परतेने करत असल्यामुळे कार्यतत्पर कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. हरवलेला मोबाईल मिळून आल्याने, संबंधित भाविकाने देखील कर्मचा-यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी असून, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल जमा करावा व दर्शन झाल्यानंतर परत घ्यावा. यासाठी पश्चिमद्वार, श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, श्री रेणूकामाता मंदिर, दर्शनमंडप पूर्वगेट इत्यादी चार ठिकाणी अल्प देणगी मुल्य आकारून मोबाईल लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.