- अनंत विचार न्यूज दिनांक 12/11/2024
प्रतिनिधी/
मंगळवेढा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत प्रचार दौरा झाला. आज सोमवार दिनांक 11 नोव्हेंबरला अनिल सावंत यांच्याकडून गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवेढा तालुक्यातील मुढवी, उचेठान, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, कर्जाळ, कात्राळ, डिकसळ, या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्याकडून प्रचार करण्यात आला.
उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना अनिल सावंत म्हणाले, आतापर्यंत पंढरपूर मंगळवेढ्याची विधानसभा निवडणुक केवळ पाणी प्रश्नावर लढली गेली आहे. या मतदारसंघातला पाणी प्रश्न कधी संपणार आहे का नाही? जर मला संधी दिली, तर मी निश्चितपणे सांगतो, पाणी प्रश्न कायमचा सोडवेल. शहरातील अंतर्गत रस्त्याची समस्या यासारख्या पायाभूत सुविधांच्या समस्या तर सोडवेनच पण या भागात मोठा उद्योग उभारण्यासाठी माझा प्रयत्न असेल.
इथल्या उच्चशिक्षित आणि होतकरू तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावं लागतं. इथल्या तरुणांना इथेच नोकरी कशी मिळेल, यासाठी माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत, त्या मी निश्चितपणे या ठिकाणी राबवेल. तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इतरत्र बाहेरगावी जावं लागतं. त्यामुळे उच्च शिक्षणाची सोय देखील याच ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे.
मंगळवेढ्यामध्ये ज्वारीचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र शेतकऱ्यांना हवा तसा मोबदला मिळत नाही. येणाऱ्या काळात ज्वारी, आणि इतर कडधान्यांपासून आवश्यक प्रॉडक्ट तयार करणारा कारखाना उभारण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. ही संकल्पना खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेबांची आहे. त्यामुळे यासाठी त्यांचा देखील पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.
याशिवाय पवार साहेबांचं या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यावर विशेष प्रेम आहे. या तालुक्यांवर पवार साहेबांच बारीक लक्ष असतं. एक उदाहरण म्हणून मी सांगतो, जेव्हा आम्ही पवार साहेबांसोबत काही दिवस होतो, तेव्हा पवार साहेब मला म्हणाले, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याने कायम समतेचा विचार देऊन तो जोपासला आहे.
गावभेट प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा वृषाली इंगळे, आदी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील म्हणाले, मी अनिल दादांची विकासासंबंधी तळमळ पहिली आहे. त्यांना राजकारणात येण्याची काहीही गरज नाही. त्यांचे अनेक उद्योग व्यवस्थितरीत्या चालू आहेत. मात्र लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप युती सरकारमध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होतायत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला उत्पादन खर्च निघेल इतकाही भाव मिळत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांची देखील सरकार पिळवणूक करतंय. महाविकास आघाडी सरकार असताना 38 रुपयांपर्यंत दुधाला दर मिळाला होता. आता मात्र 25 26 रुपये इतकाही दर हे सरकार देत नाही. त्यामुळे सरकार आणण्यासाठी पवार साहेबांचा एक शिलेदार विधानसभेत जाणं फार आवश्यक असल्याचं मत प्रथमेश पाटील यांनी मांडले.