
अनंत विचार न्यूज दिनांक 26/07/2025
श्री संत नामदेव महाराज महा संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेला दिंडी सोहळा पोलीसांनी दिड तास आडवून ठेवला.
पंढरपूर : श्री संत नामदेव महाराज यांच्या महा संजीवन समाधी सोहळ्याची परंपरा सुरु करुन अनेक दशकापासून जपणाऱ्या श्री संत कैकाडी महाराज दिंडी सोहळ्यास यंदा पंढरपूर पोलीसांनी आडकाठी आणल्याचे समोर आले आहे. यंदा श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या महा संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत, हे कारण देवून पोलीसांनी परंपरेनुसार आलेल्या दिंडीला महाव्दारातच तब्बल दिड तास आडवून ठेवले. पोलीसांच्या या आडमुठेपणाबद्दल वारकरी सांप्रदयातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्री संत नामदेव महाराज यांच्या समाधी (पायरी) येथील महा संजीवन समाधी सोहळ्याची परंपरा श्री संत कैकाडी महाराज मठाच्यावतीने वै. ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांनी सुरु केली. गेल्या काही वर्षापासून श्री संत कैकाडी महाराज मठाच्यावतीने हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत कैकाडी महाराज मठापासून पालखी सोहळा येतो आणि श्री संत नामदेव महाराज समाधी (पायरी) येथे महाआरती करुन महा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो. या वर्षी श्री संत नामदेव महाराज आणि त्यांच्या परिवाराच्या ६७५ व्या महा संजीवन समाधी सोहळ्यांच्या निमित्ताने वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराज समाधी जवळ महाआरती आयोजित करण्यात आली. त्याचवेळी परंपरेनुसार श्री संत कैकाडी महाराज मठापासून सुमारे पाच हजार वारकऱ्यासह पालखी सोहळा महाव्दारात आलेला होता. या पालखी सोहळ्याची व महाआरतीची पूर्व परवानगी काढण्यात आलेली होती. तरीही महाव्दार पोलीस चौकीजवळ हा सोहळा पोलीसांनी आडवून ठेवला. सुमारे दिड तास या सोहळ्याला तेथेच आडवून ठेवले. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमास आले होते त्याच कार्यक्रमासाठी आलेला पालखी सोहळा आडवून ठेवण्यामागे पोलीस प्रशासनाचा काय उद्देश होता ? अशी विचारणा वारकरी करीत आहेत. मुख्यमंत्री महाआरती करुन गेल्यानंतर पालखी सोहळा श्री संत नामदेव महाराज समाधीकडे सोडण्यात आला आणि सुमारे दिड तास उशीराने महाआरती संपन्न झाली.
श्री संत नामदेव महाराज आणि परिवाराच्या महा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी श्री संत कैकाडी महाराज मठ संस्थांनकडून मठापासून ते श्री संत नामदेव महाराज समाधी (पायरी) महाव्दारपर्यत दिंडी आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो. त्याठिकाणी महाआरती, पुष्पवृष्टी, भजन असा पारंपारीक कार्यक्रम पार पडतो. यानुसार यंदा श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या महा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवार रोजी श्री संत कैकाडी महाराज मठातून सुमारे पाच हजार वारकरी दिंडी घेवून श्री संत नामदेव महाराज समाधी (पायरी) कडे निघाले होते. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतलेली होती. तरीही पोलीस प्रशासनाने मा. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा असल्याचे कारण सांगून दिंडी सोहळ्यास महाव्दाराच्या अलिकडेच दिड तास आडवून ठेवले. वास्तविक मुख्यमंत्री महोदयांना सुध्दा पोलीस प्रशासनाची ही कारवाई आवडली नसती. कारण मुख्यमंत्री महोदय स्वतः विठ्ठलाचे आणि वारकरी सांप्रदयाचे निस्सीम भक्त आहेत. असे असताना, त्यांच्या दौऱ्याचे निमित्त करुन पोलीस प्रशासनाने पाच हजार वारकऱ्यांना दिड तास आडवून तिष्ठत ठेवले. शिवाय श्री संत नामदेव महाराज महा संजीवन समाधी सोहळ्याच्या पारंपारीक कार्यकमात अडथळा आणला. हि कृति परंपरेत बाधा आणणारी, धर्म विरोधी आहे. ह.भ.प. भारत महाराज जाधव अधिपती – श्री संत कैकाडी महाराज मठ, पंढरपूर