
- अनंत विचार न्यूज दिनांक 8/12/2024
प्रतिनिधी/
महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश संपादन केले . त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच यामध्ये सोलापूर मधील माळशिरस मधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर आज रविवार 8 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार मारकडवाडीत आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “निवडणूक पद्धतीत बदल करणं गरजेच आहे. देशात सध्या मारकडवाडी गावाची चर्चा सुरू आहे. ईव्हीएम मतदानातील आकडेवारी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. गावकऱ्यांना त्यांच्या गावात जमावबंदी लागू केली आहे. काही निकालांवर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत बॅलट पेपवर मतदान होते. आपल्याकडं का नाही? म्हतारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो. मारकडवाडीनं बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथे आम्हाला राजकारण आणायचे नाही. येथील लोकांच्या मनातील शंकानिरसन दूर करायचे आहे. निवडणूक आयोगाबाबत संशय दूर करायचा आहे. ग्रामस्थांनी बॅलट मतदानासाठी ठराव करावा, हा ठराव राज्य सरकारला पाठवावा”.
आमदार उत्तम जानकर काय म्हणाले? यावेळी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार उत्तम जानकर म्हणाले की, “लाडक्या बहिणींच्या दोन-चार हजार मतांचा परिणाम झाला नाही असं नाही, पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देऊ शकतो. देशातील एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, तर मग एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय?”, असा संतप्त सवालही आमदार उत्तम जानकर यांनी केला.
बॅलेट पेपर निवडणुकीला प्रशासनाचा विरोध मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. यासाठी ग्रामस्थांकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. तसंच जमावबंदीमध्ये मतदान झालं तर लोकांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. त्यामुळं अखेर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असे सांगण्यात आले.