
- अनंत विचार न्यूज दिनांक 16/10/2024
पंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 71 हजार 290 मतदार
-निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
पंढरपूर (दि.16):- निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 90 हजार 135 पुरुष मतदार तर 1 लाख 80 हजार 577 स्त्री मतदार व इतर मतदार 26 असे एकूण 3 लाख 71 हजार 290 मतदार आहेत. तसेच 552 सैनिक मतदार आहेत. विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 357 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 याप्रमाणे 357 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी 36, भरारी पथक 18, स्थिर पथक 16, व्हिडीओ पहाणी पथक 14, व्हिडीओ सर्वेक्षण पथक 2 तसेच समन्वय अधिकारी म्हणून 40 नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेमून दिलेल्या गावामध्ये संयुक्त भेटी झालेल्या असून त्याबाबतचे अहवाल कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तसेच यापूर्वी सर्व मतदान केंद्रांची सुविधा बाबतची तपासणी पर्यवेक्षक व मंडल अधिकारी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी म्हणून तक्रार निवारण केंद्र, सुविधा अॅप, टपाली मतदान सुविधा, भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडीओ पहाणी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथक तैनात करण्यात येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील मतदार संख्या ही 5334 आहे. तर अपंग मतदार(पी.डब्ल्युडी) 2710 आहे. ज्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येणे शक्य नाही, अशा मतदारांना होम वोटिंग सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पंढरपूर मतदार संघात एकही केंद्र संवेदनशील नाही. तर 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे निवडणूक नियंत्रण व समन्वय कक्ष व कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. याव्दारे सर्व पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आचारसंहितेबाबत काही तक्रारी असल्यास सी व्हिजील अॅप वापरण्यात येत आहे. तर उमेदवारांना लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना व सुविधा प्रणालीव्दारे अर्ज करण्याची सुविधा उपल्बध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी यासाठी व्होटर हेल्पिंग ॲपचा करु शकता.
भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी आदर्श आचार संहिता दि. 15 ऑक्टो. रोजी पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेली आहे. दि. 22 ऑक्टो. रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार अहे. नामनिर्देशन 23 ते 29 ऑक्टो. पर्यंत, अर्जाची छानणी 30 ऑक्टो.पर्यंत, उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर,दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया दि. 25 नोव्हेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. आदर्श आचार संहिता जाहीर झाल्यापासून पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व राजकीय पक्षांचे भित्तीपत्रके, घोषवाक्ये, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे तातडीने यंत्रणे मार्फत हटविण्याचे काम चालू आहे.
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी व्हिलचेअर, रॅम्पची सुविधा, उमेदवारांसाठी अर्ज भरणे सोपे जावे म्हणून सुविधा अॅपची मदत घेता येणार आहे. 50 टक्के मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही सुविधा उपल्बध करण्यात आली आहे. उमेदवारांचा निवडणूक खर्च तीन वेळा तपासला जाणार आहे. सोशल मिडीयाचा वापर उमेदवार व मतदारांनी जपून वापर करावा असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी इथापे यांनी केले.
निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे :-
निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावे व काय करु नये याची आयोगाने सूची तयार केली आहे. यास सर्वाधिक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी व यात अंतर्भूत असलेले मजकूर सर्व उमेदवाराच्या राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत. तसेच तो राज्याच्या राजभाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात यावा याविषयी आयोगाचे निर्देश दिलेले आहेत.
उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या असे स्पष्टपणे निदर्शनास आणून देण्यात यावे की, काय करावे व काय करू नये याची सूची केवळ वानगीदाखल असून ती सर्वगगावेशक नाही आणि ज्यांचे काटेकोरपणे पालन व्हावयास पाहिजे असे इतर तपशीलवार निदेश/अनुदेश हे पर्यायी म्हणून किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा हेतू नाही.
“काय करावे“
(१) निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील
(२) पूर,आवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसगिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालू ठेवता येऊ शकेल
(३) मरणासन्न किया गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल
(४) मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना/निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजेत त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना/निवडणूक लढवणार्या उमेदवारांना नि:पक्षपातीपणे करता आला पाहिजे
(५) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी
(६) शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा
(७) स्थानिक पोलीस प्राधिकार्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यकती परवानगी घेतलेली असावी
(८) प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निबंधक किया प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावं. आवश्यक असल्यास, त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी
(९) प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी
(१०) सभांमध्ये अडथळे आणणार्या किंवा अन्य सुव्यवस्था बिघडवणार्या व्यक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
(११) मिरवणूक सुरू होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकार्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यायी
(१२) मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निबंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करून घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे, त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे
(१३) मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये
(१४) मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजित रीतीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे
(१५) सर्व कार्यकत्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत.
(१६) मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्याबर कोणतेही चिन्ह,उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असु नये
(१७) प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंधाचे पूर्णतः पालन करण्यात यावें.
(१८) निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच फक्त मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक/मतदार प्रतिनिधी याव्यतिरिक्त कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही.
(१९) निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किवा समस्या, आयोग/निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र/प्रक्षेत्र दंडाधिकारी/भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात
(२०) निवडणूक आयोग/निवडणूक निर्णय अधिकारी/जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबीविषयीचे निदेश आदेश/सूचना यांचे पालन करण्यात यावे.
(२१) आपण (एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसला तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे
“काय करु नये “
(१) सत्ताधारी पक्ष/शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती
काढण्यास प्रतिबंध आहे.
(२) कोणताही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय
मतदान कक्षात किवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही
(३) शासकीय कामाची निवडणूक मोहीम/निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये
(४) मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये
(५) मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये
(६) वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नये
(७) इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर
टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
(८) इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यास्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पण करू नये
(९) देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे भित्तीपत्रके, संगी यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही
(१०) मतदारांना लाच देणे,मतदारांवर गैरवाजवी दडपण,मतदारांना धाकदपटशा दाखविणे तोतयेगिरी,मतदान केंद्रापासून १०० मीटर्सच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.
११) लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे यांचा कोणत्याहों परिस्थीतीत अवलंब केला जाणार नाही
(१२) स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आबर भित, वाहने इत्यादीच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता), ध्वजदंड उभारण्यासाठी निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी,घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही
(१३) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये.
(१४) ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये
(१५) मिरवणुकीतील लोक क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यात येऊ नयेत
(२६) इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भितीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत
(१७) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये
(१८) ध्वनिवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालल्या वाहनावर वसविलेले असोत त्यांचा सकाळी ६.०० पूर्वी किंवा रात्री १०.०० नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये
(१९) सबंधित प्राधिका-याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुकांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये, सर्वसाधारणपणे अशा सभा/मिरवणुका रात्री १०-०० नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम, परीक्षेचे दिबस इत्यादी सारख्या परिस्थितीच्या अधीन असेल
(२०) निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप केले जाणार नाही
(२१) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात (१०० मीटर्सच्या आत), प्रवेश करणार नाही. तसेच अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदारासंघामध्ये फिरणार नाही. जर सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती, मतदार असेल तर केवळ मतदान करण्यासाठी सोबत असेलेल्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह त्याच्या/तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालील
(२२) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा
मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये.
टीप- काय करावे किंवा काय करू नये यांची वरील सूची केवळ वानगीदाखल असून ती सर्वसमावेशक नाही.वरील विषयावरील इतर तपशीलवार आदेश, निदेश/सूचना यांना पर्यायी असणार नाही. त्यांचे काटेकोर पालन करावेच लागेल.