
अनंत विचार न्यूज दिनांक 6/10/2024
पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्रा निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे दि.04 ऑक्टोंबर रोजी भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी यांचे नातु विराज जोशी, पुणे यांचा अभंग वाणीचा कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री व विराज जोशी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी गायक श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विभाग प्रमुख राजेश पिटले, संजय कोकीळ, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी व संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाची पहिलं स्वरपुष्प भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी गुंफले. शास्त्रीय गायनामध्ये राग शुध्द कल्याण गात अभिजात शास्त्रीय संगीताचा दमदार वारसा चालवणार याची रसिकांना खात्री पटली. त्यानंतर वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करत आजोबा भारतरत्न भिमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या प्रसिद्ध संतरचना त्यामध्ये आता कोठे धावे मन. माझा भाव तुझे चरणी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. जय दुर्गे दुर्गती परिहारीणी, भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा, जे का रंजले गांजले, अणुरणीया थोकडा आदी संतरचना गाऊन शेवटी अगा वैंकुठीच्या राजा या भैरवीने आजोबा भारतरत्न भिमसेन जोशी यांच्या आठवणी जागवल्या व सर्व रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला तबला पांडुरंग पवार, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम ओंकार पाठक व टाळ अक्षय सरदेशमुख यांनी वाजवला. सदरचे कार्यक्रम मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक – गायिका यांची उपस्थिती असणार असून, सर्व रसिक श्रोत्यांनी लाभा घ्यावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले.