
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 29 may 2024, anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 15 may 2024, vote, vote news, vote logo, pandharpur vote
अनंत विचार न्यूज दिनांक 15/5/2024
संपादकीय…
काय होईल हो निकाल
नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर ऐकमेकाला भेटलेल्या दोन व्यक्ती निकाल काय होईल? याविषयी औत्सुक्यानं चर्चा करतात. खरं तर एरवी निवडणुका एकतर्फी होतात तेव्हा चर्चा फारशी नसते.सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये नाही म्हटलं तरी निवडणूक अत्यंत चुरशीची अशीच झाली आहे.
सुरुवातीच्या काळात ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला सहज, सोपी जाईल असं मानलं जात होतं. पण उमेदवारी जाहीर होताच वातावरण बदलत गेलं हे नक्की. निवडणूक कोणालाही सहज सोपी नव्हती हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे.
प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस आघाडी कडून महिनाभर आधीपासून प्रचार सुरू ठेवला. तुलनेत राम सातपुते यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली आणि त्यांना वेळही कमीच मिळाला. तिकडे निंबाळकरांना भरपूर वेळ मिळाला त्यांनी जोरदार प्रचार केला. कमी वेळेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकरां पेक्षा अधिक व्यापक प्रचार करण्यामध्ये काही दिवसातच आघाडी घेतली हे नक्की. गावोगावी त्यांच्या समर्थकांकडून सभा, बैठका सुरू होत्या.
वातावरण एकदम बदलून गेलं. सोलापूर आणि माढा लोकसभा या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांसमोर खरा प्रश्न आहे तो उजनी – पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा. याबाबत कोणाच उमेदवाराकडून फारशी अशी ठोस आश्वासन दोन्ही मतदारसंघात मिळालेली नाहीत. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर आहे. त्याबाबतही मोठे कारखाने, उद्योग आणण्याच्या दृष्टीने ठाम आश्वासन अशी काहीच नाहीत.
महागाई ,भ्रष्टाचार हे मुद्दे काही ठिकाणी विरोधकांनी उपस्थित केले. बहुतेकांनी मोदी सरकारच्या विरोधात मुद्दे मांडणं पसंत केलं. पण आपण काय करणार हे सांगितलं नाही. विरोधकांमध्ये फाटा फूट करणं, त्यांच्याविषयी गैरवाजवी विधान करणे असे प्रकार सत्ताधारी महायुतीकडून झाले आहेत. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालीच नाही. शेवट मात्र धर्मवाद-जातीवाद यात मत विभागणीकडे या आणि त्या दोन्ही बाजूने झाला आहे.
सुरुवात कोणी केली यावरही आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. तो आता मुद्दा नाही. कारण मतदान संपून गेलं. निकाल इलेक्ट्रो मतपेटीत बंद आहे. 4 जूनला निकाल येईल. राजकीय विश्लेषक विशेषतः पत्रकारांना कुठेही लोक हाच प्रश्न विचारतात काय होईल? बारा ते तेरा लाख मतदान झालं आहे. प्रत्येकाच्या मनातील कसं काय सांगता येईल?अगदी जाती धर्मावर मतदान झालं आहे असं चित्र पुढे आलं.प्रत्यक्षात नावापुढील बटन दाबेपर्यंत अनेक जण आपला विचार बदलतात असं अनेकदा आपण आपल्या बाबतीतही अनुभवलं आहे. काही पक्षांची व्होट बँक निश्चित असते.
पण बदलणार मतदानही मोठ्या प्रमाणावर आहे. मागच्या वेळी तसं झालं म्हणून यावेळी असं होईल हे,अनुमान काढणं म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्षात तसंच होईल असं नाही. पत्रकारांना सारं काही माहिती असतं असा अनेकांचा गैरसमज आहे. अर्थात थोडीफार अधिक माहिती समजू शकते. कारण ते प्रत्येकाचा कल विचारत असतात. चर्चा करत असतात पण यातून येणारा निर्णय हा अंतिमतः सत्यच असेल असं नाही. अनेक राजकीय विश्लेषक, अभ्यासक यांचे अंदाज यापूर्वी नेहमीच चुकले आहेत.
इतकच काय तटस्थपणे काही कंपन्या सर्व्हे करतात त्यांचेही अंदाज पूर्णपणे चुकले हे आपण एक्झिट पोल मध्ये अनुभवलं आहेच.निवडणुकीत कोणाला कोणी मतदान केलं हे गुप्त असतं. एवढ्या मोठ्या मतदारसंघांमध्ये जरी जात,धर्म किंवा एखाद्या मुद्द्यावर मतदान बदललं असलं तरी त्याला शंभर टक्के एकतर्फी प्रतिसाद मिळेल असं अजिबात नसतं.
अविनाश सी.कुलकर्णी
_______________________________________________
अनंत विचार न्यूज दिनांक 15 5/2024
संपादकीय..
.निवडणूक अंदाज बांधणं का कठीण असतं
निवडणूकीमध्ये मतदान होतं आणि ते ही लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात, तेव्हा अंदाज बांधणं मुश्कील असतं. धर्माच्या आधारावर मतदान झालं असं चित्र वेगान येत असलं तरी हा मुद्दा लक्षात घ्या. वेगवेगळ्या विचारांची मंडळी प्रत्येक जाती धर्मामध्ये आहेतच. एक समाज एकत्र झालं तर दुसरा समाज अपोआप एकत्र होतो हे पुढार्यांनाही माहित आहे.
मुद्दे नसतात तेव्हा असा जातीवादी आधार घेतला गेल्याची अनेक उदाहरण आहेत. विकासाच्या मुद्यावर तर अनेकांची मतमतांतर असतात. आपल्याला जो नेता किंवा पक्ष आवडतो त्याने केलेल्या चुका प्रत्येक जण पोटात घालतो किंवा दुर्लक्ष करणं महत्त्वाचं मानतो. विरोधी पक्ष किंवा विरोधी गटातील उमेदवारांच्या चुका मात्र प्रत्येकजण जोमानं मांडतो. अनेकदा अशीच माणसं पत्रकारांच्या समोर येतात आणि मग कल नक्की कोणाचा? कोणाकडे? असा प्रश्न त्यांच्यासमोरही निर्माण होतो.
सोलापूरातही अशी स्थिती सध्या दिसत आहे. आता लोक इतके हुशार झाले आहेत की समोरचा प्रश्न विचारणारा, त्याचं नाव, आडनाव, कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे पाहून त्याप्रमाणे आपले मत मांडतात. हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला असेल. काय होणार आणि काय व्हावं यामध्ये फरक करायला शिका. काय व्हावं, हेच, असंच होणार ! असं सांगण्याचा आपण प्रयत्न करतो, आग्रही भूमिका घेतो त्यामुळे अनेकदा काही थापाही मारल्या जातात. मग आपण जाहीर केलेले अंदाज पूर्णपणे फसतात. प्रत्यक्ष स्थिती ग्राउंड लेव्हलला काय आहे? याचा अंदाज अनेकदा प्रसारमाध्यमं पाहूनही अनेकांना होत नाही.
हल्ली तर आपण पाहतो प्रसार माध्यमांवरही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत असतात. तरीदेखील अजूनही लोकांना वाटतं पत्रकारांना बरंच काही समजत. उत्सुकतेपोटी ते विश्लेषण ऐकत बसतात. काही ठिकाणी पत्रकारांना बर्याच चर्चा नंतर अंदाज येतही असेल. अनेक पत्रकार आजही प्रमाणिकपणे काम करतात. अशाप्रसंगात जनतेचा विश्वास महत्त्वपूर्ण आहे. जनतेही सर्वांनकडे संशयानं पहाणं सोडावं. कांही मत ठामपणे मांडली पाहिजेत तर अंदाज येतो. विरोधकांचही म्हणण ऐकून थोडाफार दुसर्या बाजूनही विचार केला पाहिजे.
एखाद्या पत्रकारांन किवा विश्लेषकानं मत मांडलं तर पूर्ण विश्लेषण ऐकावं. मांडणार्यावर लगेचच अविश्वास किवा विश्वास ठेवू नये. तटस्थपणे ऐकून, चर्चा करुन निर्णय घेतला पाहिजे, मत बनविल पाहिजे. हल्ली सारीच क्षेत्र भ्रष्ट झाली आहेत. यामुळे पडताळणी अवघड आहे. एखाद्यानं विचार मांडले तर ते त्यांनी तसे मांडले म्हणजे तो त्या बाजूच्या विचारांचा,पक्षाचा आहे असं मत बनविणं गैर आहे. त्याच्या समोर जी माहिती आली ती त्यांनी मांडली आहे हे लक्षात घ्यावं. मत मांडणारा त्या बाजूला झुकला आहे.
पाकीटबाज आहे. त्या पक्षाचा पेड वर्कर आहे. वगैरे वगैरे आरोप करण्यातही लोकमागे नसतात. म्हणून अनेकदा अनेकजण मतही व्यक्त करत नाहीत. असो निवडणुकांचा निकाल काय होणार? याविषयी चर्चा म्हणून ठीक आहे पण अंतिम निकाल हा चार तारखेलाच स्पष्ट होईल. तेव्हाच सारे अंदाज खरे की खोटे. कौनं कितना पानी मे ! हे लक्षात येईल. तोपर्यंत चर्चा तर होणारचं. सोलापूरच्या निवडणूकीत तसेच कोणत्याही ठिकाणच्या निवडणूकीत एक फॅक्टर सर्व मतं खेचण्यासाठी कधीही महत्वाचा नसतो. जात, धर्म, तत्कालीन प्रश्न, प्रादेशिकता, भाषा, कोणी किती पैसे वाटले. भाषणं किती प्रभावी. विविध मुद्यांची माहिती किती? असे एक ना अनेक फॅक्टर आहेत.
शिवाय लोक उमेदवार पेक्षा त्याचा नेता आणि पक्ष याचाही अनेकदा विचार करतात. मत देताना बटण दाबेपर्यंत अनेक विचारांती अनेकांचे निर्णय होतात. मग अंदाज बांधणं कसं शक्य आहे. दावे करणं वेगळा विषय आणि अंतिम स्थिती, निर्णय काय? हा वेगळा विषय असतो.
अविनाश सी.कुलकर्णी