
ANANT VICHAR NEWS, 8 April 2024 News, लक्ष्मीबाईनी केलेल्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेचा पाया पक्का बनला :- प्रा. डॉ. सदाशिव कदम, ,marathi newsशिक्षण संस्था, news,photo, images, jpeg, jpg
अनंत विचार न्यूज दिनांक 8/4/2024
पंढरपूर – “महाराष्ट्र समृद्ध करण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महात्मा फुले- राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव निर्माण केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालविला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी रयतमाउली लक्ष्मीबाई यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. लक्ष्मीबाईनी केलेल्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेचा पाया पक्का बनला. त्यांचा त्याग आपण ध्यानात घेऊन तो जपला पाहिजे” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त समारंभ समिती, सांस्कृतिक विभाग, प्राध्यापक प्रबोधिनी व कमवा व शिका योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील: जीवन आणि कार्य’ या विषयावर व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य प्रिं. डॉ. जे. जे. जाधव, सुभाषआबा सोनवणे, अमरजीत पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. सदाशिव कदम पुढे म्हणाले की, “सुरुवातीच्या काळात सनातनी संस्कारात वाढलेल्या लक्ष्मीबाईनी आपल्या पतीच्या सामाजिक कार्याच्या तत्वाचा स्वीकार केला.
वसतीगृहात आलेल्या मुलांचे संगोपन केले. त्यांचे खाणे-पिणे-राहणे याबाबी सांभाळल्या अनेक प्रसंगी आजारपणात सेवा-सुश्रृषा केली. वसतीगृहातील मुलांच्या जेवणासाठी त्यांनी स्वत:चे सर्व दागिने विकले शेवटी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र पवित्र अशा शैक्षणिक कार्यापासून त्या तसूभरही ढळल्या नाहीत. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात हिरिरीने भाग घेवू शकले. लक्ष्मीबाईंचा त्याग आपण विसरता कामा नये”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर झालेले पुरोगामी संस्कार त्यांच्या जीवनाला वळण देणारे ठरले. एखादी संस्था सुरु करताना आणि ती नावारूपास आणताना फार मोठ्या प्रमाणात त्याग आणि परिश्रम करावे लागतात. भाऊराव पाटील यांना त्यागी माणसे भेटली त्यामध्ये लक्ष्मीबाई यांचे योगदान बहुमोल आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल आदी विभागातील शिक्षक–शिक्षकेतर सेवक, कार्यालयीन सेवक, विद्यार्थी-विद्यार्थ्यीनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार समारंभ समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.