
चंद्रभागेचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न :- ॲड. माधवी निगडे पुणे, ANANT VICHAR NEWS, 17 march 2024 News,arathi news,newspaper, anant vichar
अनंत विचार न्यूज दिनांक 17/3/2024
पंढरपूर (ता.17) – ‘ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर’ असे अभंगातून वर्णन असलेल्या चंद्रभागा नदीपात्रात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येणारा प्रत्येक वारकरी भाविक स्नान करत असतो. या चंद्रभागाचे पात्र स्वच्छ रहावे व त्याचे पावित्र्य जपण्यासाठी आज 17 मार्च रोजी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या सदस्या ॲड.माधवी निगडे यांनी दिली.
या स्वच्छता अभियानामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर व वारकरी सेवा संघ पुणे यांचा संयुक्त सहभाग होता. यामध्ये श्री संजय बोरगे, दौंड, भोर, बारामती, इंदापूर, शिरूर, आंबेगाव इत्यादी पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील सुमारे 200 वारकरी भाविकांनी सहभाग घेतला होता.
सद्यस्थितीत, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असल्याने पदस्पर्शदर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तथापि, वारकरी भाविक पंढरपूर वारीला येत आहेत, जरी देवाचे पद दर्शन झाले नाही तरी, वारी सार्थकी लागावी या संकल्पनेतून चंद्रभागा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शक्यतो, वारकरी सेवा संघाचा असा प्रयत्न राहील की, दर महिन्याच्या शुध्द नवमीला व त्रयोदशीला वारक-यांचे टप्प्या टप्प्याने ग्रुप करून येतील व वाळवंटात साफसफाई करतील. जेणेकरून, दशमी व पौर्णिमेला येणा-या वारकरी भाविकांना चंद्रभागा वाळवंट स्वच्छ मिळेल, अशी ह.भ.प.राजाभाऊ चोपदार, अध्यक्ष वारकरी सेवा संघ यांनी यावेळी सदभावना व्यक्त केली.
दर महिन्याला येणा-या वारकरी भाविकांचा एक-एक ग्रुप यामध्ये जोडला जावा, वारक-यांनी येऊन स्वयंस्फुर्तीने स्वच्छता केली पाहिजे व चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे, या निर्मळ भावनेतून सेवेसाठी येणा-या वारकरी भाविकांना मंदिर समिती मार्फत स्वच्छता साहित्य व अन्नछत्रात भोजन व्यवस्था करण्यात येते. या संकल्पनेत पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिंड्याचा सहभाग वाढावा म्हणून समन्वयकाची भूमिका मंदिर समिती सदस्या ॲड.माधवी निगडे पार पाडीत आहेत.