
एक मार्च पासून सहकार शिरोमणी कारखाना देणार टनाला तीन हजार, ANANT VICHAR NEWS, 1 march 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 6/3/2024
कल्याणराव काळे:ऊस गळीतास देण्याचे आवाहन
*भाळवणी दि.२९ : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एक मार्चपासून गळीतास येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना कल्याणराव काळे म्हणाले, यंदाचा गळीत हंगाम खूपच आव्हानात्मक परिस्थितीत सुरू झाला. ऍडव्हान्स देऊनही ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा न आल्यामुळे दैनंदिन गाळपक्षतेच्या उद्दिष्टामध्ये सातत्य ठेवण्यासाठी सर्व संचालक मंडळ, शेती विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळे गळपात सातत्य राहिले. ऊस दराच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर कारखान्यांच्या बरोबरीने कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिला हप्ता प्रति टन २७०० रुपये जाहीर केला. २७०० रुपयांप्रमाणे ऊस बिल आणि ऊस तोडणी वाहतूक कमिशनसह वाहनमालकांची बिले हंगाम सुरू झाल्यापासून दहा दिवसाला संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे ऊस उत्पादनात आणि साखर उता-यात होणारी संभाव्य घट विचारात घेऊन उतारा घट अनुदानाच्या स्वरूपात प्रतिटन तीनशे रुपये एक मार्चपासून जादा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्याच्या दृष्टीने नेहमीच एफआरपी पेक्षा जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला आहे.तीच परंपरा पुढे चालू ठेवून संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कल्याणराव काळे उपाध्यक्ष भारत कोळेकर कार्यकारी संचालक झुंजार आसबे व संचालक मंडळाने केले आहे.