
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचा स्वरतरंग व चित्राविष्कार कार्यक्रम , ANANT VICHAR NEWS, 16 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, group photo, pandarpur education society, students of pandharpur.
अनंत विचार न्यूज दिनांक 16/2/2024
चार हजार विद्यार्थी सादर करणार कला
पंढरपूर : येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित कवठेकर प्रशाला, द. ह.कवठेकर प्रशाला, अध्यापक विद्यालय, पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, आदर्श बाल व प्राथमिक विद्यालय या सर्व शाखांमध्ये शिकत असलेल्या 4000 विद्यार्थ्यांचा ‘स्वरतरंग’ हा समूह गायनाचा कार्यक्रम व कवठेकर प्रशाला व द.ह. कवठेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा ‘कलाविष्कार’ हे चित्रकला प्रदर्शन शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी द. ह. कवठेकर प्रशाला, वीर सावरकर पथ,
पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी अडव्होकेट श्रीनिवास पटवर्धन आहेत.
या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व शाखातील 4000 विद्यार्थी एकत्रितपणे गुरुवंदना, राष्ट्रभक्ती, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील 10 गाणी सामुहिक सादर करणार आहेत. या विद्यार्थ्यांचा सराव गेली तीन महिने संगीत शिक्षक विनोद शेंडगे, राजेश खिस्ते, उमेश केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जात आहे. समूहगान हे पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.
यापूर्वी कवठेकर प्रशालेत संपन्न झालेल्या कार्यक्रमास तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात सामूहिकरीत्या गीत गायन करणारी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे.
या कार्यक्रमात उभय प्रशालेतील पाचवी ते दहावी पर्यंतच्या बालचित्रकारांनी साकारलेल्या चित्रांचे अनोखे प्रदर्शन स्व. विजेंद्र जोशी कलादालनात प्रशालेत आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात निसर्गचित्र, संकल्प चित्र, स्मरणचित्र, रचनाचित्र, कोलाजकाम, आर्कचित्रे ,अक्षरचित्रे , वारली चित्रे तसेच कॅनवास वरील पेंटिंग अशा विविध विषया वरील व विविध माध्यमांमधील आकर्षक 300 चित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन कलाशिक्षक अमित वाडेकर, रमेश देवमारे व सहकलाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
हे प्रदर्शन पुढील तीन दिवस पालकांसाठी खुले राहील. तरी 17 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या ‘स्वरतरंग’ व ‘कलाविष्कार’ या दोन्ही कार्यक्रमास पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव एस.आर. पटवर्धन, .सु.त्रि.अभ्यंकर, अध्यक्ष नाना कवठेकर, चेअरमन वीणाताई जोशी सर्व शाखांचे शाखाप्रमुख व्ही. वाय. पाटील, व्ही. एम. कुलकर्णी, एच.आर. वाघमारे, एम.डी. सांगोलकर, एस.डी. मोहोळकर यांनी केले आहे.