
अनंत विचार न्यूज दिनांक 17/12/2023
महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यातून १३५० किलोमीटर वारीचा प्रवास राहणार असून, समता विचार सांगणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
प्रतिनिधी/
‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ २०२३ , वर्षीच्या मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी – कवयित्री प्रा अलका सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. प्रा सपकाळ या सजग समाजभान असलेल्या साहित्यिक कवयित्री असुन कृतीशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत . सपकाळ यांनी आपल्या साहित्याद्वारे शेतकरी , कष्टकरी , उपेक्षित , वंचित महिला यांच्या वेदनांना त्या शब्दरुप देत समाजासमोर घेउन आल्यात , बंधुता अन समन्वयवादी विचारांच्या पुरस्कर्त्या असलेल्या सपकाळ यांना संत साहित्यातही विशेष रुची आहे .
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन आयोजित समता वारीचे हे ६ वे वर्षे असुन, सोमवार १ जानेवारी २०२४ श्री संत चोखामेळा महाराज कर्मभूमी मंगळवेढा येथून निघून शुक्रवार १२ जानेवारी २०२३ रोजी जगद्गुरु संत तुकोबाराय जन्मभूमी देहुगाव येथे सदरील समता वारीचा समारोप होणार आहे. ही वारी महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव , बीड, संभाजीनगर , नगर, पुणे आदी ८ जिल्ह्यातुन १३५० किलोमीटर प्रवास करणार आहे. समाजातील वाढत जाणारी दरी, विषमता,जातीयवाद, नक्षलवाद, दहशतवाद आदी विषयांवर सकारात्मक प्रबोधन करत समाज जागृती करण्यात येणार आहे.वारकरी संतांनी सांगितलेल्या समता , बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी
चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे . माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होउन समाजात बंधुभाव वाढीस लागावा यासाठी व समता, मानवता व बंधुभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचण्यासाठी ही वारी निघत आहे.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने मागील ५ वर्षांपासून ‘ चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातून १३२० किलोमीटर प्रवास करत प्रतिवर्षी १ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान शाळा , महाविद्यालय, वाड्या वस्ती , गाव , शहर या ठिकाणी जाऊन समाजात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी प्रबोधन केले जाते . वारकरी संतानी सांगितलेल्या समता , मानवता आणि बंधुभाव या मूल्यांचा जागर केला जातो .
समाजातील जातीय – धार्मिक विद्वेषी दरी कमी होउन , आपापसात बंधुभाव वाढावा हा समता वारी आयोजन मागील मुख्य उद्देश आहे . एकसंघ समाज हा राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे . जात ,पंथ ,धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत . हा विचार घेऊ सामाजिक एकतेसाठी चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते .
माणसाची मन जोडण्यासाठी निघालेल्या , दुरदर्शी -सर्वस्पर्शी व्यापक लोकहिताचा विचार घेउन तुमच्या गाव शिवार , वाड्या वस्ती , शाळा महाविद्यालयात , शहरात येत असलेल्या समाजहिताच्या या वारीत सहभागी होत वारकरी संत अन महापुरुषांच्या विचारांच्या वाटेवरुन आपण ही मार्गस्थ होउया .