
अनंत विचार न्यूज दिनांक 16/12/2023
शासनाकडून 73.85 समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोटीचा निधी,
पंढरपूर (ता.१६) – श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांची मंदिरे खुप प्राचीन स्वरूपाची आहेत. मंदिरांचे सुशोभिकरण केल्यास, त्याची प्राचीन शैली जपण्यास मदत होणार आहे. शिवाय, सर्व मंदिरे पुरातन असल्याने त्यांची दुरावस्था होत असल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मंदिराच्या सर्वांगीण विकास कामाचा सर्वंकष आराखडा (डि.पी.आर.) पुरातत्व विभागाच्या नामिका सुचीतील वास्तुविशारदाकडून तयार करण्यात आला असून,
यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. यानुसार कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिरास मुळ प्राचीन रूप प्राप्त होणार असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सदरचा आराखडा (अंदाजित रक्कम रू.73.85/-) हा पुरातत्व खात्याच्या सल्ल्याने व जिर्णोद्वाराच्या संबंधित आवश्यक त्या सर्व कायद्यातील तरतूदीचा अवलंब करून तयार करण्यात आलेला असून, सदर आराखड्याला मंदिर समिती, जिल्हास्तरीय समिती व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील
दि.23/05/2023 रोजी पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत रुपये 7385.95 लक्ष किंमतीच्या श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती.
या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पुरातत्व विभागामार्फत ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये मे. सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची ई निविदा (रू.27,44,11,765) मंजुर करण्यात आली आहे. याकामामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन संवर्धन, मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबो, सोळखांबो, अर्धमंडप इ.),
रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नुतनीकरण, महाद्वार व दोन्ही बाजुच्या पडसाळी 5, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर, मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा तसेच मंदिरातील 38 परिवार देवता काशी विश्वेश्वर, शनैश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर वगैरे) मंदिरातील दीपमाला इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. सदरची सर्व कामे मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता होणार आहेत.
सदर कामाचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री श्री.चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्तिकी एकादशीच्या शुभमुहर्तावर गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी पहाटे 3.30 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात बाजीराव पडसाळी येथे संपन्न झाला होता.
त्यानुसार आज बाजीराव पडसाळी येथे पहिल्या टप्प्यातील कामास विधिवत पूजा करून प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री.संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड, बांधकाम विभाग प्रमुख श्री.बलभिम पावले व सदर कामाचे ठेकेदार श्री येवले उपस्थित होते.
या मुख्य मंदिरा शिवाय, पंढरपूर शहरातील 24 परिवार देवता मंदिरे जतन/दुरुस्ती व संवर्धन (भाग-2) कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्याकडे सादर केले आहे. तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आराखड्यांतर्गत जतन/
दुरुस्तीशिवाय इतर कामे जसे विद्युतीकरण, विद्युत रोषणाई, सी.सी.टि.व्ही., अग्नीशमन यंत्रणा इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत विभाग) सोलापूर यांच्याकडून प्रस्तावित असून त्यांच्याकडुनही लवकरात लवकर निविदा कार्यवाही करण्यात येत असून, वरील सर्व कामे 24 महिन्यात पूर्ण करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.
_______________________________________________
2) अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मंदिर समिती मार्फत लाडूप्रसादाची निर्मिती
अनंत विचार न्यूज दिनांक 16/12/2023
पंढरपूर (ता.16) :- श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने श्रींचा प्रसाद म्हणून भाविकांना बुंदी लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. सदरचा बुंदी लाडूप्रसाद विहित प्रक्रिया राबवून आऊटसोर्सिंग पध्दतीने दि यशोधरा महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या, नाशिक यांचेकडून खरेदी करण्यात येत होता. रिफाईड शेंगदाणा तेलातील बुंदी लाडूप्रसाद (एक लाडू प्रति 70 ग्रॅंम याप्रमाणे दोन लाडूचे लेबलसह कागदी पॅकेट) प्रति पॅकेट रू.12.50/- प्रमाणे दि.01/07/2022 पासून तीन वर्षासाठी ठेका मंजुर करण्यात आला होता.
तथापि, सदर ठेकेदाराने करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केला होता. याशिवाय, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार कार्यवाही न करणे, लाडूप्रसादामध्ये ड्रायफुटचा समावेश न करणे, चांगल्या दर्जाचा व मागणीनुसार लाडूप्रसाद न पुरवठा करणे, कमी दर्जाच्या तेलाचा वापर करणे. कमी वजनाचा, को-या पाकीटावर लाडूप्रसाद पुरवठा करीत असल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांची रू.22.50/- लक्ष इतकी अनामत मंदिर समितीकडे जमा करून घेण्यात आली आहे.
सद्यस्थितीत, मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामधून दि.12/04/2023 ते दि.31/10/2023 या कालावधीत 35 लक्ष लाडू प्रसादाची विक्री झाली आहे, यामधून 3.50 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले असून, 2.40 कोटी खर्च झाला आहे. भाविकांना चांगल्या दर्जाचा व गुणवत्तेचा तसेच पुरेसा प्रमाणात लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वारकरी भाविकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंदिर समितीने केला आहे. वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ही मंदिर समिती कार्य तत्पर असल्याचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने आज एमटीडीसी भक्त निवास येथील बुंदी लाडू प्रसाद उत्पादन केंद्राची पहाणी केली. याप्रसंगी सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
येणारा प्रत्येक भाविक माय बाप विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूप्रसाद खरेदी करीत आहे. त्यासाठी पश्चिमद्वार व उत्तरद्वार येथे सकाळी 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत विक्री स्टॉल सुरू ठेवण्यात आले असून, MTDC भक्तनिवास येथील उत्पादन केंद्रात लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी सेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना कॅप, ॲप्रोन व वैयक्तिक स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
या लाडुसाठी डबल refined शेंगदाणा तेल, तुकडा काजू, बेदाणा, कोरडी हरभरा डाळ, सुपर एस साखर, वेलदोडे, रंग इत्यादीचा वापर करून लाडू प्रसाद तयार होत असून, सद्य:स्थितीत केवळ भाविकांना गुणवत्तापूर्ण लाडू प्रसाद उपलब्धिवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कामी आवश्यक कच्चा माल खरेदीच्या सर्व निविदा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
आऊटसोर्सिंग पध्दतीने घेण्यात येणा-या लाडूप्रसादाबाबत सन 2021-22 (तपासणी वर्ष 2022-23) या वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये काही आक्षेप आले होते. सदरचा लेखापरीक्षण अहवाल पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 मधील तरतुदीनुसार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशनात विधानमंडळाचे दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला आहे.
तथापि, लेखा परिक्षकाने अहवाल सादर करण्यापूर्वीच म्हणजे दि.15/02/2023 रोजीच्या सभेत आऊटसोर्सिंग पध्दतीचा ठेका रद्द करून मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना दि.12/04/2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध
प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामी अनुभवी कर्मचारी श्री पृथ्वीराज राऊत यांना लाडू प्रसाद विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. लाडूप्रसादाच्या गुणवत्तेबाबत मंदिर समिती कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, वारकरी भाविकांचे हित जोपासण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
_______________________________________________
3 ) मार्गशीर्ष मासात श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर
अनंत विचार न्यूज दिनांक 16/12/2023
पंढरपूर (ता.16) :- प्रतिवर्षी प्रमाणे मार्गर्शीर्ष शुध्द 1 दि.13/12/2023 ते मार्गशीर्ष वद्य 30 दि.11/01/2024 या कालावधीत विष्णूपद उत्सव संपन्न होत आहे. या उत्सवास अनन्य साधारण महत्व असून श्री.विष्णूपद मंदिर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सदर ठिकाणी वनभोजनाची प्रथा असून, या ठिकाणी मंदिर समिती मार्फत आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मंदिर समितीने सन 2015 मध्ये पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे ताब्यात घेऊन, त्यांचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामध्ये गोपाळपूर रोडवरील विष्णूपद मंदिराचा समावेश आहे. या मंदिराच्या ठिकाणी उत्सवानिमित्त दर्शनरांगेसाठी बॅरीकेटींग, स्वच्छतेसाठी कर्मचा-यांची नियुक्ती, अभिषेक करण्याची सोय, सुरक्षतेच्या दृष्टीने कमांडोजची नियुक्ती करण्यात आली असून, मंदिर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
त्या अनुषंगाने आज श्री. विष्णुपद मंदिरास भेट देऊन पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख श्री अतुल बक्षी उपस्थित होते.
चंद्रभागेच्या तीरावर निसर्गरम्य अशा पंढरपुरपासून दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. चंद्रभागा तीरावरील या मंदिराला बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील असून चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे. याठिकाणी देव गोपालक आणि आपल्या गाईंसमवेत येऊन क्रीडा करीत असल्याच्या आख्यायिका असून येथील दगडावर अनेक ठिकाणी गाईच्या आणि गोपालकांच्या पायाच्या आकाराच्या खुणा दगडात तयार झालेल्या आहेत. मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी आणि गोपाळकाल्याच्या भांड्याच्या खुणा दगडात दिसतात.
मार्गर्शीर्ष शुध्द 1 ते मार्गशीर्ष वद्य 30 अखेर श्री.विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर असते अशी धारणा आहे. त्यामुळे महिनाभर विष्णूपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते. मार्गशीर्ष वद्य 30 या दिवशी श्री.विठ्ठलाची सवाद्य रथ मिरवणूक काढून प्रदक्षिणा मार्गाने रथ नामदेव पायरीजवळ येतो अशी परंपरा असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी दिली.