
अनंत विचार न्यूज दिनांक 1/3/2025
गादेगाव, पंढरपूर | छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त ज्योतिर्लिंग बहुद्देशीय समाजसेवी संस्था, गादेगाव यांच्या वतीने “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या मोफत वाटपाचा विशेष उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, गादेगाव येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत काॅ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या ऐतिहासिक पुस्तकाच्या १०० प्रती विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य समजावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या वेळी उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक सूरज जगदाळे सर, ज्योतिर्लिंग बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रमेश फाटे, इंजिनिअर शुभम फाटे, नवनियुक्त पोलीस कर्मचारी सुखेशनी गव्हाणे, अभिमान पवार, औदुंबर माने, औदुंबर गव्हाणे, संजय बागल, शांतीनाथ बागल, गणेश बागल , नवनाथ बागल, अशोक बागल सर, विक्रम गायकवाड, गाजरे सर, गायकवाड सर यांनी शिवरायांच्या कार्यातून मिळणाऱ्या प्रेरणेवर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर आदर्श शासक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेले शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि मान्यवरांचे ज्योतिलिंग बहुद्देशीय समाजसेवी संस्था, गादेगाव यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
शिवचरित्राचा जागर करताना इतिहासाची खरी मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.